कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरात 15 सप्टेंबर 1855 रोजी प्रथमच नगरपरिषदेची स्थापना झाली. कराड नगर परिषद शहराची अत्यंत जिव्हाळ्याची आपुलकीची संस्था, या संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे बघितली. त्यामध्ये घडणाऱ्या अनेक बदलाची साक्षीदार ही संस्था आहे. कराड शहरातील व परिसरातील अनेक नवीन घटनांची सुरुवात या वास्तू मधूनच झाली आहे. दैदिप्यमान कारकीर्द असणाऱ्या कराड नगरपरिषदेचा आज वर्धापन दिन यानिमित्त थोडक्यात महिलांच्या राजकीय इतिहासाचा आढावा..
कराड शहर सुधारण्याच्या दृष्टीने नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. शहरात एकूण 6 विभाग होते. यामध्ये ब्राम्हण आळी, मंगळवार, बुधवार, भ्रजपतवार, शनिवार व रविवार या सहा विभागांचा समावेश होता. या नगपालिकेला तब्बल 141 वर्षांनी पहिली महिला नगराध्यक्षा 1996 रोजी अर्चंना अशोकराव पाटील या मिळालेल्या होत्या. त्यानंतर मात्र कराड पालिकेत पुढील 25 वर्षात 7 महिला नगराध्यक्षा पदावर विराजमान झालेल्या आहेत. तर मुलीच्या शिक्षणाबाबत कराड शहर ब्रिटीश कालखंडापासून जागृत असल्याचे दिसून येते. 1 मे 1869 मध्ये मुलींची मराठी शाळा सुरू करण्यात आली होती. तर लोकांच्या माध्यमातून 1942 साली दुसरी शाळा सुरू करण्यात आली.
https://twitter.com/VishalVamanPat1/status/1438051550270685188?s=20
कराड नगरपालिकेचे 30 एप्रिल 1858 रोजी पहिले अध्यक्ष सर बोल्टन, उपाध्यक्ष कृष्णराव वामन व 8 संचालक नेमण्यात आलेले होते. पालिकेत नागरिकांच्यातून प्रथम नेमलेले नारायण अनंत मुत्तालीक यांची 1867-1877 मध्ये नेमणूक केलेली होती. पालिकेची पहिली निवडणूक 10 जुलै 1885 पार पडली. 25 फ्रेबुवारी 1927 रोजी महात्मा गांधी यांनी दुसऱ्यांदा कराडला भेट दिली. कराड शहर व नगरपालिकेच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण होता. यावेळी नगरपालिकेने महात्मा गांधी यांना मानपत्रही दिले.
महिलांना 1938 नंतर संधी सुरू
1938-1940 या कालखंडात नगरपालिकेत सोमवार, गुरूवार व शुक्रवार या तीन वाॅर्डात फिरत्या क्रमाने महिलांसाठी जागा ठेवण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये गंगूबाई जनार्दन गुणे या महिला पहिल्या नगरपालिकेत होत्या. 1943- 1946 मंगलाबाई विंगकर (6वर्ष सभासद), पहिल्या महिला उपाध्यक्ष 1946-1947 वासंतिकाबाई वसंतराव दात्तार होत्या. 1952 यशोदाबाई वाटवे, खुदेजा उमर नदाफ या दोन महिला एकाचवेळी नगरपालिकेत होत्या.
कराडला पहिल्या नगराध्यक्षा 141 वर्षांनी
पहिल्या नगराध्यक्षा 1996 अर्चंना अशोकराव पाटील यांना संधी मिळाली. त्यानंतर बाळूताई भिमराव सुर्यवंशी, शारदाताई जाधव, सुषमा लोखंडे, विद्याराणी साळुंखे, उमा हिंगमिरे, संगिता देसाई व सध्या लोकनियुक्त व विद्यमान रोहीणी शिंदे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.