हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी संपूर्ण देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831रोजी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला होता. सावित्रीबाई फुले या समाजसेविका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज स्त्रियांना शिक्षणासाठी दारे उघडी झाली आहेत. त्यामुळे दरवर्षी त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 3 जानेवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. आज आपण त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म एका दलित कुटुंबामध्ये झाला होता. पुढे जाऊन त्यांचे लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले यांना साक्षर बनविले. त्यानंतर या फुले दांपत्याने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा सुरू केल्यानंतर त्याला अनेकांकडून विरुद्ध दर्शवण्यात आला. परंतु आपल्या भूमिकांवर ठाम राहत फुले दांपत्याने ही शाळा सुरू ठेवली. या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षकेची भूमिका निभावली.
पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील सावित्रीबाई फुले यांनी हार न मानता वाईट गोष्टींविरोधात लढा दिला. तसेच, सर्व मुलींनी आणि स्त्रियांनी शिक्षण घेणे का गरजेचे आहे हे पटवून दिले. मुलींना शिकवत असताना सावित्रीबाई फुले यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु त्या कुठेही डगमगल्या नाहीत. शेवटी त्यांना देशभरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शाळा उघडण्यास यश आले. त्यांनी केलेल्या या महान कार्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा सत्कार देखील केला.
आज संपूर्ण भारतामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळेच प्रत्येक स्त्री स्वातंत्रपणे शिक्षण घेऊ शकते. त्यावेळी जर सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला नसता तर आज कित्येक मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या असता. खरे तर सावित्रीबाई फुले या फक्त पहिल्या भारतीय महिला शिक्षिका ठरल्या नाहीत तर त्या देशातील प्रत्येक मुलीसाठी मार्गदात्या बनल्या. त्या एक समाजसेविका होत्या, त्यांनी स्त्रियांना गुलामगिरीत ठेवणाऱ्या अनेक प्रथांविरोधात आवाज उठवला. तसेच त्यांच्यासाठी शिक्षणाची, मुक्तीची दारे उघडी करून दिली. या सगळ्यात त्यांना महात्मा फुले यांची मोलाची साथ लागली.