हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ मानलं जातं. वर्षभर गर्दीने फुललेलं हे ठिकाण यंदा एका विशेष पर्यटन महोत्सवाचं आयोजन करत आहे. 2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वरमध्ये तीन दिवसीय पर्यटन महोत्सव पार पडणार असून, यासाठी येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे अनेक प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टोलमध्ये सूट देण्यात आली –
या निर्णयाची अधिकृत घोषणा वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केली. सहसा महाबळेश्वरच्या प्रवेशद्वारावर, पाचगणी आणि इतर मुख्य टप्प्यांवर बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून माणसी तत्त्वावर टोल आकारला जातो. पण , महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या टोलमध्ये सूट देण्यात आली असून, त्यामुळे हजारो पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.
भव्य सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येणार –
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. 3 मे रोजी महाबळेश्वरच्या साबणे रस्त्यावर एक भव्य सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येणार असून, स्थानिक खाद्यसंस्कृतीचं दर्शनही यावेळी घडवण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप 4 मे रोजी होणार असून, या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, आणि संगीत व नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर, या महोत्सवात शंभरहून अधिक तंबूंची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच, पर्यटकांना वेण्णा तलावामध्ये नौकानयन, साहसी खेळ आणि फोटोग्राफी स्पॉट्स यांचा अनुभव घेता येणार आहे.
टोलमाफीमुळे पर्यटकांची गर्दी –
मुंबई, पुणे आणि इतर भागांतून महाबळेश्वरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, टोलमाफीमुळे पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या अनुभवासाठी पर्यटकांत प्रचंड उत्साह दिसून येत आहेत.




