हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे प्रवासी समृद्धी महामार्गावरून ( Samrudhhi Mahamarg) प्रवास करतायत त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 1 एप्रिल 2025 पासून समृद्धी महामार्गावरील टोलचे दर 19% नी वाढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे, कारण टोल शुल्क वाढल्याने त्यांचा प्रवास खर्च वाढेल. या निर्णयामुळे नागरिक, व्यापारी आणि प्रवासी संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर हे नवे दर कसे असतील याची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
जास्त खर्च सहन करावा लागणार –
नागपूर ते मुंबई या 701 किमी लांब मार्गावर प्रवास करणाऱ्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागेल. नवीन दरानुसार, मुंबई ते नागपूर मार्गावरील प्रवाशांना 1445 रुपये टोल भरणे आवश्यक होईल, तर नागपूर ते इगतपुरी प्रवाशांना 1290 रुपये टोल भरावा लागेल. हे दर 31 मार्च 2028 पर्यंत लागू राहणार आहेत. या टोलवाढीमुळे नागपूर ते इगतपुरी 625 किमी लांबीचा मार्ग खुला असताना, लवकरच इगतपुरी ते आमने, जो 76 किमीचा उर्वरित मार्ग आहे, तो देखील प्रवाशांसाठी सुरू होईल. डिसेंबर 2022 मध्येही समृद्धी महामार्गावरील टोल वाढवण्यात आले होते, पण आता ही दुसरी टोलवाढ लागू होईल.
नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी टोलचे दर –
वाहनांच्या प्रकारानुसार टोलचे दर वेगवेगळे असतील .
कार, हलकी मोटार गाड्यांसाठी सध्या 1080 रुपये टोल आकारला जातो पण नवीन नियमानुसार 1290 रुपये द्यावे लागणार.
तीन आसांची व्यावसायिक वाहनांसाठी सध्या 3990 रुपये तर नवीन नियमानुसार 4750 रुपये.
अवजड बांधकाम यंत्रसामुग्रीसाठी 5740 रुपये तर 1 एप्रिलपासून 6830 रुपये.
अति अवजड गाड्यांसाठी सध्या 6980 रुपये तर नवीन नियमानुसार 8315 रुपये.
हलकी, व्यावसायिक, मिनी बससाठी सध्या 1745 रुपये , नवीन दर 2075 रुपये .
बस किंवा दोन आसांचा ट्रक 3655 रुपये अन नवीन नियमांतर्गत 4355 रुपये .
या टोलवाढीमुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे, ज्यामुळे काही प्रवाशांवर आर्थिक दबाव पडू शकतो.