हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले याकडे वळत आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिक पर्यटनस्थळी वन डे ट्रिप काढत आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातही अशी काही पर्यटनस्थळे व धबधबे आहेत कि त्या ठिकाणी आपण एका दिवसात जाऊन येऊ शकतो. सातारा शहरापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांना त्याच्याकडे खुणावतोय. या ठिकाणी येणारे पर्यटकास काय ती झाडी..काय तो डोंगर.. काय तो धबधबा एकदम ओकेच ! असल्यासारखे वाटेल, हे मात्र नक्की…
सातारा जिल्ह्याला निसर्गाची देणगी लाभली आहे. मात्र, कोरोनामुळे 2 वर्ष झाली सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. आता ती पर्यटकांसाठी खुली झाली असल्याने पावसाबरोबर पर्यटनस्थळे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. सातारचा प्रसिद्ध ठोसेघर धबधबा सध्या चांगलाच फेसाळला असून डोंगर दऱ्यांना पालवी आणि पाझर फुटू लागल्याने निसर्ग हिरव्या रंगाने नटला आहे.
ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो. पावसाच्या पहील्या सरी बरसताच पर्यटकांचे पाय आपोआप या ठिकाणी ओढले जातात. सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर जवळ जवळ असल्याने आनंद द्विगुणित करतात.
ठोसेघरला जायचे कसे?
ठोसेघर येथे येण्यासाठी सातारा बस स्थानकातून व राजवाडा येथील बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सोय आहे. या बसेस प्रत्येक तासाला सातारा ते ठोसेघर फेरी मारतात. ट्रेन ने येणाऱ्यांसाठी माहुली हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु सज्जन गड ठोसेघर व चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प एकाच मार्गावरील ठिकाणे जवळच असल्याने एका दिवसामध्ये या ठिकाणाला पर्यटकांना दुचाकी अथवा चारचाकी वाहनांनी भेट देता येते.
कसा आहे निसर्ग?
ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून २४ किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावानजिक उगम पावणाऱ्या तारळी नदीवर आहे. या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अदभुत नजारा पहायला मिळतो. दाट धुक्यांच्या दुलईत फेसाळणारा धबधबा या ठिकाणी पर्यटकांचे लक्ष हे वेधून घेतो. या ठिकाणी 2 धबधबे असून एक लहान धबधबा 110 मीटर उंचीवरून कोसळतो तर दुसरा साधारण 350 मीटर उंचावरून कोसळतो. दऱ्या कपारीतुन वाट काढत तब्बल आकराशे फुट खोल दरीत हा ठोसेघरचा धबधबा कोसळत आहे. येथे आलेले पर्यटकही काय ती झाडी.. काय तो डोंगर.. काय तो धबधबा एकदम ओकेच.. असे म्हणू लागलेत.
काय काळजी घ्यावी?
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक असलेले ठोसेघर हे कायम पर्यटकांनी गजबजलेले असते. या याठिकाणी पावसाळ्यात शाळा, महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांच्या पावसाळी सहली कायम येतात. मात्र, या ठिकाणी आल्यास कहाणी गोष्टींची काळजीही घेतली पाहिजे. या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सोबत छत्री किंवा रेनकोट असणे गरजेचे आहे. तीव्र उतारावरून वाहणारे पाणी असल्याने पाण्यात जाणे टाळावे. जेवण व नाष्टासाठी त्या परिसरामधील हॉटेल्समध्ये जावे.