देशभरात आता पावसाने विश्रांती घेतली असून वातवरण आल्हाददायक आहे. अशा स्थितीत तुम्ही विकेंडला किंवा दिवाळी आणि नाताळ च्या सुट्टीला कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सुट्टीच्या काळात तुम्ही जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जंगल सफारीचा आनंद तुम्ही नागपूर आतल्या ताडोबा अभयारण्यात घेऊ शकता. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पर्यटन आता १ ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून पर्यटनासाठी खुलं होणार आहे.
खरंतर पावसाळा असल्या कारणामुळे ही पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. मात्र आता राज्यभरात देखील पावसानं उसंत घेतल्यामुळे जंगल सफारीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दल सांगायचं झाल्यास पावसामुळे रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सध्या परिस्थितीमध्ये या प्रकल्पातील सिल्लारी गेट, खुरसापार्गेट बनेरा गेट व चोर बाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर बोर व्याघ्र प्रकल्पात बोरधरण पर्यटन गेट पासून २० किलोमीटर पर्यंत रस्ते सफारी करिता उपलब्ध राहणार आहेत. तर दुसरीकडे उमरेड पवनी कऱ्हांडलाअभयारण्यातील कऱ्हांडला पर्यटन झोन, पवनी पर्यटन झोन आणि गोठण गाव पर्यटन झोन अंतर्गत 15 किलोमीटर व वीस किलोमीटर रस्ते सफारीला अनुकूल नाहीत.
ऑनलाइन पद्धतीने करता येणार बुकिंग
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला ऑफलाइन बुकिंग करावे लागेल. गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादित सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे तर दिनांक 16 ऑक्टोबर पासून महाइको टुरिझमच्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.