संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे ‘या’ मार्गावरील वाहतूकीत बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून 2023 रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सेाहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने) खेरीज करुन इतर सर्व वाहतूक मार्गात बदल केला आहे. यामध्ये निरा, लोणंद, पंढरपूर मार्गावर दि.18 ते दि. 23 या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.

यामध्ये दि. 17 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 21 जून रोजी रात्रीपर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे. तसेच आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे. दि. 17 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते दि. 22 जून रोजीचे दुपारी 1 वाजेपर्यंत पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. तसेच दि. 17 जून ते दि.21 जूनपर्यंत फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

दि. 21 जून पासून ते दि. 23 जून रोजीपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. दि. 21 जून पासून ते दि. 23 जूनपर्यंत नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. दि. 21 जूनपासून ते दि. 23 जून पर्यंत नातेपुते कडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी -सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

दि. 21 जूनपासून ते दि. 23 जूनपर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे. दि. 22 जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6 वाजता मार्गस्थ होणार आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.