Tuesday, October 4, 2022

Buy now

कराडमध्ये दुर्घटना : पालिका कर्मचाऱ्यांचा चेंबर साफ करताना गुदमरून मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहराच्या वाखाण परिसर येथे मोठी दुर्घटना घडली. अंडरग्राउंड ड्रेनेज साफ करत असताना नगरपालिकेचा एका कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर मदतीला गेलेला दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नगरपालिकेकडे अत्यावश्यक सोयी- सुविधा नसल्याने ही घटना घडल्याचे समोर येत आहे. अनिरूध्द लाड असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर जखमींचे अमोल चंदनशिवे असे कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड नगरपालिकेचे अनिरूध्द व अमोल हे वाखाण परिसरातील चेंबर साफ करीत होते. यावेळी अत्यावश्यक आॅक्सिजन गॅस नसल्याने चेंबरमध्ये श्वास गुदमरला होता. त्यामुळे दोन्ही कर्मचारी बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल ॲम्बुलन्स तात्काळ घटना स्थळी दाखल झालेली होती. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता श्री. पवार घटनास्थळी दाखल झाले होते.

कर्मचाऱ्यांना चेंबरमधून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात यश आले. तात्काळ स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा हाॅस्पीटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु या दुर्घटनेत अनिरूध्द लाड या कर्मचाऱ्यास प्राणास मुकावे लागले. तर दुसरा कर्मचारी अमोल चंदनशिवे यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.