तुम्ही लांब पल्ल्याचा ST प्रवास केला असेल तर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील. बहुतांशी ST च्या थांब्यांमध्ये प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागतो. काही थांबे असे असतात की जिथे जेवायचे सोडाच तिथले पाणी पिण्याची सुद्धा इच्छा होत नाही इतकी अस्वच्छता असते. शिवाय महागडे आणि बेचव जेवण, अस्वच्छ टॉयलेट्स, आणि वाईट वागणूक – प्रवाशांचं नाहक हालच होतंय. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
तर थांबा होणार बंद
प्रवाशांच्या तक्रारींना अखेर न्याय मिळणार आहे. मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत – अशा हॉटेल आणि मोटेल थांब्यांचं सर्वेक्षण करा आणि प्रवाशांना जर आरोग्यदायी व परवडणाऱ्या सुविधा मिळत नसतील, तर ते थांबे थेट रद्द करा! त्यासोबतच नव्या, दर्जेदार थांब्यांना मंजुरी द्या.
पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
या संदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना पुढील १५ दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्यभर सुरू असलेल्या थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण करुन तिथल्या परिस्थितीची चाचपणी करण्यात येणार आहे.
राजकीय दबाव झेलू नका
मंत्री सरनाईक यांनी खास सूचना दिल्या आहेत – या मोहिमेत कोणताही राजकीय दबाव स्वीकारू नका. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी तडजोड करता येणार नाही. अस्वच्छता, अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.




