व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सांगली ते मातोश्री पायी प्रवास : दोन युवक निष्ठा यात्रा घेवून ठाकरेंच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील 2 शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. ठाकरे परिवार व शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरूड पायी प्रवास करत निघाले आहेत.

या दोन्ही शिवसैनिकांचे साताऱ्यातील शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. अजय आणि अक्षय या शिवसैनिकांनी हातात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर घेऊन पायी चालत निष्ठा यात्रा काढली आहे. रोज 40 किलोमीटरचा प्रवास करून ते मुंबईत 18 आॅगस्ट रोजी पोहचणार आहेत. मातोश्री पोहचल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपला पाठिंबा आणि निष्ठा व्यक्त करणार आहेत.

आज शिवसेनेत फूट पडून शिंदे गट वेगळा झाला आहे. अशावेळी शिवसेना पक्षावर व ठाकरे कुटुंबियावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सामान्य शिवसैनिकांची ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उभी केली. आज त्याचा मुलगा व नातू पुन्हा तीच शिवसेना उभी करेल, त्यासाठी आम्ही सोबत आहोत. राज्यातील जनतेची निष्ठा कुटुंबिया सोबत आहे, यासाठी पायी चालत निष्ठा यात्रा काढल्याचे अक्षय आणि अजय यांनी सांगितले.