हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिनांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व देशांना हादरून टाकले आहे. अन आता अशीच एक बातमी समोर आली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या बाहेर तयार होणाऱ्या सर्व वाहनांवर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 एप्रिलपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांचा असा निर्धार आहे की, या धोरणामुळे अमेरिकेतील उत्पादन वाढवता येईल, तसेच देशांतर्गत उत्पादित गाड्यांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही. पण या निर्णयाचा परिणाम अमेरिकेच्या ग्राहकांवर होताना दिसणार आहे.
कारवर 25 टक्के शुल्क –
ट्रम्प यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली. “आम्ही अमेरिकेत तयार नसलेल्या सर्व कारवर 25 टक्के शुल्क लावणार आहोत. मात्र, जर कार अमेरिकेत बनवली गेली तर त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही,” असे ते म्हणाले.
शुल्क फक्त परदेशातून आयात होणाऱ्या कारवरच लागू होणार –
हे शुल्क फक्त परदेशातून आयात होणाऱ्या कारवरच लागू होणार नाही, तर हलक्या वजनाच्या ट्रकवरही या दरवाढीचा परिणाम होईल. सध्या, अमेरिकेत आयात होणाऱ्या गाड्यांवर 2.5 टक्के शुल्क लागू होते, तर ट्रकवर 25 टक्के शुल्क आहे, जो ‘चिकन टॅक्स’ म्हणून ओळखला जातो. 2 एप्रिलपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे वाहन उत्पादक कंपन्या आणि संबंधित देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, या निर्णयामुळे अमेरिकन ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो, तसेच वाहन उत्पादकांच्या पुरवठा साखळीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
जागतिक व्यापार संबंधांमध्ये तणाव –
ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि व्यापार असमतोल कमी करणे आहे. पण, या निर्णयामुळे अमेरिकेच्या जागतिक व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.