तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव
नाशिक | महापालिकेत शिस्तीचे वातावरण, विकासकामांसाठी त्रिसूत्री रचना राबविण्यात पुढाकार घेणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपने अविश्वास ठराव दाखल केला आहे. शिवसेनेची मालमत्ता करावरील सूट देण्याची अट मान्य झाल्यास ते तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काम करतील. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात येईल. नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. नवी मुंबईत भाजप वगळता सर्व पक्षांनी मुंढेंविरोधातअविश्वास ठराव आणला होता. लोकाभिमुख कार्य करण्यात आघाडीवर असलेल्या मुंढेना हटविण्याचा प्रयत्न केल्यास सर्व राजकीय पक्षांविरोधात एकत्र येण्याचा ईशारा ग्राहक पंचायतीचे प्रमुख विलास देवळे यांनी दिला. शहर विकासासाठी मुंढेंसारख्या प्रशासकाची गरज असल्याचं मत सिडकोच्या संचालिका डॉ सरिता औरंगाबादकर यांनी व्यक्त केलं.
पालिका प्रशासनातील अनावश्यक खर्चाला मुंढेंनी चाप लावला आहे, त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येऊन सकारात्मक बदलही दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांची गरज आहे असं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमेर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केलं.