हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले आहेत. त्यामुळे भाविकांनी विशेष काळजी घ्यायची आहे.
तुळजाभवानी मंदिरांचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर संस्थानांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात नो एंट्री आहे. याबाबत मंदिर परिसरात फलक लावण्यात आले असून आज म्हणजे गुरुवार पासून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना मंदिर प्रवेशदारावर अडवण्यात आले आहे. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे आवाहन मंदीर संस्थांनने केले आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आलेत. त्यानुसार, मंदिर परिसरात महिलांना शॉर्ट स्कर्ट, वन पीस, शॉर्ट पॅन्ट घालून एंट्री मिळणार नाही. विशेष म्हणजे फक्त महिलाच नव्हे तर पुरुष मंडळीना सुद्धा शॉर्ट कपडे घालता येणार नाहीत. आज तर बरमुडावर आलेल्या अनेक मुलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे . संस्थानच्या या निर्णयाचे मंदिरातील पुजारी आणि स्थानिक भाविकांनी स्वागत केले आहे.