हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतेत आहे. आता या चिंतेत आणखी भर पडू शकते, कारण येत्या काळात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमतीत मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका भारताला बसत आहे. चीनमधून येणाऱ्या मालावरील मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे टीव्ही, वॉशिंग मशीन आणि एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या थेट फटका खरेदीदारांच्या खिशावर पडणार आहे.
मार्केट मधील काही तज्ज्ञांच्या मते, गेल्या 2 महिन्यांत काही ठिकाणच्या मालवाहतुकीत जवळपास चारपट वाढ झाली आहे. पूर्वी युरोप आणि मध्यपूर्वेतून भारतात जाण्यासाठी सागरी जहाजे सुएझ कालव्याच्या मार्गाने जात असत. पण, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर आता त्यांना सुमारे 8500 किमीचा लांबचा रस्ता धरावा लागणार आहे. सुमारे 12 हजार कंटेनरने भरलेल्या सुमारे 330 मोठ्या जहाजांनी हा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मे महिन्यापासून चीनच्या बंदरांवर जहाजांची कमतरता भासू लागली आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या उत्पादन पद्धतीतही बदल करावा लागणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत लॉजिस्टिक खर्चाचा वाटा सुमारे 2 ते 3 टक्के आहे. हाही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जो काही अतिरिक्त खर्च कंपन्यांना करावा लागतोय तो सगळा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जहाजांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जितका वेळ लागायचा त्या वेळेत सुद्धा आता ३५ ते ४० % नी वाढ झाली आहे. लाल समुद्राच्या या एकूण संकटामुळे (Red Sea Conflict) जगभरात 20 आणि 40 फूट कंटेनरच्या किमती वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होणार असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमती वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही.