व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

TV अभिनेत्रीची आत्महत्या; मालिकेच्या सेटवरच लावला गळफास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच गळफास लावून तिने आपले जीवन संपवले आहे. तुनिषा शर्मा हिने इतके मोठे पाऊल नेमके का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तुनिषाने मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा मृतदेह फासावर लटकलेला कोणीतरी पाहिल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतू त्याठिकाणी डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. तुनिषा शर्माने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून कळू शकले नाहीये. मात्र तिच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मृत्यूच्या सहा तास आधी तुनिषा शर्माने तिची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यासोबत तुनिषा शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जे जोशाच्या जोरावर पुढे जातात, ते थांबत नाहीत.’ तिची शेवटची पोस्ट पाहून ती एक प्रबळ इच्छाशक्तीची व्यक्ती होती हे स्पष्ट होते. मात्र अचानक तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

20 वर्षांच्या तुनिषा शर्माने ‘भारत के वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या ऐतिहासिक मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला, शेर-ए-पंजाब: महाराज रणजीत सिंह, इंटरनेट वाला लव आणि इश्क सुभानल्लाह यांसारख्या मालिकांचा भाग होती. याशिवाय तिने चित्रपटांमध्येही काम केले होते. कहानी 2, बार बा देखो आणि फितूरमध्येही ती दिसली होती.