डॉक्टरांचा हलगर्जीपणा! एसीच्या थंडीने गारठून दोन नवजात बालकांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन नवजात बाळांचा एसीच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला आहे. याप्रकारणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. परंतु, या घटनेमुळे बाळांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाने  डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरनगरमधल्या बसेरा गावातील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याच्या दोन नवजात बालकांना स्थानिक खासगी दवाखान्यातील फोटोथेरपी युनिटमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. परंतु रात्रीच्या वेळी रूममधला एसी चालूच राहिल्यामुळे दोन्ही बाळांचा थंडीने गारठून मृत्यू झाला. ज्यामुळे ही बाब दापत्याच्या लक्षात आली त्यावेळी संपूर्ण रुग्णालयात गोंधळ उडाला. बालकांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

यानंतर या सर्व घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी आले. पुढे त्यांनी, नवजात बालकांच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. तसेच रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. नीतू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. नीतू यांच्यावर अनावधानाने झालेल्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, या सर्व घटनेचा सखोल तपास करण्यात यावा असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.

सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी कैराना पोलिस स्टेशनचे प्रभारी नेत्रपाल सिंह करत आहेत. याप्रकरणात दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्यामुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाने डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे खाजगी रुग्णालयांबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच, रुग्णाच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.