विद्यानगरला कोयता व विटांनी मारामारी : दोघे जखमी, चौघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील फार्मसी काॅलेज समोर किरकोळ कारणावरून कोयता व विटांनी मारहाण करून दोघांना जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यानगर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

या प्रकरणात सुश्मित ठोंबरे, सागर कांबळे, दीपक माने व केके (पूर्ण नाव, गाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर त्यांनी केलेल्या मारहाणीत सुमित हणमंत पवार व आदित्य अभिजीत पवार (दोघेही रा. वहागाव, ता. कराड) हे जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरकोळ कारणावरून संशयितांनी विद्यानगर येथील रेणुका मेडिकल समोर रस्त्यावर कोयत्याने व विटांनी सुमित पवार व आदित्य पवार या दोघांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला. दरम्यान मारहाणीनंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी सुमित पवार व आदित्य पवार या दोघांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. याबाबत सुमित पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काटे करत आहेत.