आठवडा बाजारात दुचाकींची समोरासमोर धडक : युवक जागीच ठार
वाठार | पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे आठवडा बाजारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तरुण जागीच ठार झाला. वाठार-सोळशी रस्त्यावर संभाजी महाराज पतसंस्थेनजीक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तेजा रमेश भोसले (वय- 40, रा, तरडगाव, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. तर दत्तात्रय चंद्रशेखर नेवसे (वय- 23, रा. करंजखोप, ता. कोरेगाव) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुकचा आठवडा बाजारा दिवशी अपघात झाला. वर्दळीच्या वेळी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच- 11 सीएम- 2747) दत्तात्रय हा पिंपोडेकडून करंजखोपला निघाला होता. त्याचवेळी समोरून नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून येत असलेल्या तेजा व दत्तात्रय यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
दोन्ही गाड्यांची धडक इतकी जोरदार होती की, तेजा दुचाकीवरून हवेत उडून डांबरावर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले. या अपघाताची नोंद वाठार पोलिस ठाण्यात झाली आहे.