कराड- पंढरपूर रस्त्यावर टॅंकरने दोन महिलांना उडविले : एक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | झरे (ता. आटपाडी) येथे कराड- पंढरपूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने भरघाव टँकरने दोन महिलांना उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये दोन दुचाकींचा चुराडा झाला. संगीता प्रकाश पवार (वय ४५, रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राणी सुरेश पवार (रा. झरे, ता. आटपाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, झरे येथे भरधाव आलेल्या टँकर (एमएच- 50- 8888) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टँकरने पारेकरवाडीचे मंगेश धोंडीराम दगडे यांच्या दुचाकीचा चुराडा केला. पालीच्या खंडोबाला जाण्यासाठी पती सुरेश पवार यांची वाट पाहत रस्त्यालगत थांबलेल्या त्यांची पत्नी राणी पवार यांना टँकरने उडविले. त्‍या गंभीर जखमी झाली. दरम्यान, नारायण सकट या नातलगांना भेटून प्रकाश जयवंत पवार व त्यांची पत्नी संगीता हे दोघे घरातून बाहेर पडले होते. नारायण सकट व प्रकाश पवार हे दोघे बोलत होते. रस्त्यालगत टीव्हीएस लुनाजवळ पतीची वाट पाहणाऱ्या संगीता पवार यांना टँकरने उडविले. या धडकेत त्या सुमारे 10-15 फूट उंच उडाल्या. त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटने दरम्यान चौदा चाकी टँकरच्या मागील दोन चाकाची जोडी ट्रकच्या जॉईंटमधून निसटली. ती वेगाने सचिन राजमाने यांच्या दुकानाच्या समोरील ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला जाऊन धडकली. त्यामुळे ही भिंत कोसळली. या अपघातानंतर टँकर चालकाने कराड पंढरपूर रस्त्याने शेनवडी (ता. माण) च्या दिशेने पळ काढला. गावातील तरुणांनी पाठलाग करून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.