“स्त्री शिक्षणाची सुरुवात थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली, फुलेंनी ती पुढे नेली” : उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात एक वेगळं आणि चर्चास्पद विधान समोर आलं आहे. साताऱ्याच्या राजघराण्याचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी स्त्री शिक्षणासंदर्भात दिलेलं विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

उदयनराजेंनी म्हटलं की, “स्त्री शिक्षणाची खरी सुरुवात थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली होती. त्यांनी त्यांच्या राजवाड्यातच पहिली शाळा सुरू केली होती. याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण करत पुढे काम केलं.”

इतिहासाच्या संदर्भात ठाम भूमिका

उदयनराजेंनी कार्यक्रमात पुढे सांगितलं की, “महापुरुषांविषयी कोणी अपमानास्पद बोलत असेल, तर त्याविरोधात कठोर कायदा हवा आहे. शिवाजी महाराज यांचं अद्याप अधिकृत शासकीय चरित्र प्रसिद्ध झालेलं नाही, ते तात्काळ व्हावं. तसेच सेन्सॉर बोर्डात इतिहासाचे जाणकार असावेत.”

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावर रोखठोक मत

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाविषयी सुरू असलेल्या वादावरही उदयनराजेंनी स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त केलं. “इतक्या लांब कानाचा कुत्रा भारतात आहे का? हे ब्रिटिशांची कुत्रं आहे. फेकून टाका ते शिल्प. काही गोष्टींवर फार विचार करण्याची गरज नसते, योग्य ती कृती केली पाहिजे,” असं ते म्हणाले.

दिल्लीतील स्मारकाची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केवळ समुद्रातच नाही तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही व्हावं, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. “दिल्लीतील गव्हर्नर हाऊसजवळ 48 एकर जागा आहे. राज्यपालांना वास्तव्यासाठी एवढी जागा लागते का? त्या जागेत शिवरायांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावं,” असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सगळ्या विधानांनी एकीकडे ऐतिहासिक संदर्भांवर चर्चा रंगली असताना, दुसरीकडे काही मुद्द्यांवरून नवा वादही उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र, उदयनराजेंच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांचं वक्तव्य निश्चितच लक्षवेधी ठरलं आहे.