ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!! कलम 370 बाबत भाजप- मेहबुबा मुफ्तीमध्ये नेमकं काय ठरलं होतं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहार येथील पाटणा मध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती सय्यद यांच्या शेजारी बसल्याने भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही भाजपला जशाच तस उत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. मेहबुबा मुफ्ती सय्यद यांना भाजपने वचन दिले होते कि 370 कलम हटवणार नाही, आणि म्हणून त्यांनी भाजपसोबत युती केली अस आपल्याला खुद्द मेहबुबा मुफ्ती सय्यद यांनीच सांगितल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी वरील विधान केलं. पाटणा मध्ये मी मुद्दाम मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसलो. कारण त्या आता भाजपच्या लॉंड्रीत स्वच्छ झाल्या आहेत. मी काल पाटण्यात असताना त्यांना विचारलं, भाजपवाले निर्लज्ज आहेत, ते तुमच्याबरोबर आहे पण तुम्ही कस काय त्यांच्यासोबत गेलात? त्यावर उत्तर देताना मुफ्ती यांनी सांगितलं कि सत्तास्थापनेवेळी भाजपने मला वचन दिले होते कि कलम ३७० हटवणार नाही, म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला असा मोठा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे . तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही अजून त्यावर काही बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. भाजपच्या हातून देश कधीच सुटला आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही खलनायक ठरवत आहात. मी नायक आहे की खलनायक हे जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहीत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.