निवडणूक आयोग मोदींचे गुलाम; बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर आज उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग हे मोदींचे गुलाम आहे असं म्हणत गद्दारांना धनुष्यबाण पेलणार नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे, पण शिवसेना संपणार नाही. आपण पुन्हा एकजुटीने लढू. मी खचलो नाही आणि खचणार सुद्धा नाही. रावणाने सुद्धा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता आणि तोच उताणा पडला त्याचप्रामणे या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. देशातील सर्व यंत्रणा मोदींच्या गुलाम झाल्या आहेत. नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असेल तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. यापूर्वी भाजप शिवसेना युती असलयाने मोदींच्या नावाने मते मागितल्याचा आरोप आपल्यावर केला जातोय, पण आता मात्र बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे असं ठाकरे म्हणाले.

जेव्हा काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला तेव्हा त्यांना ते चिन्ह दिलं गेलं. जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केली.