चंद्रकांत पाटील गोमूत्रधारी, भाजपचा उल्लेख उंदीर; उद्धव ठाकरे तुटून पडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशीद पाडली तेव्हा तिथे शिवसैनिक आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नव्हते अस विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील हे गोमूत्रधारी आहेत असं म्हणत त्यांनी भाजपचा उल्लेख उंदीर असा केला. मातोश्री येथील पत्रकार परिषद उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. पण बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे ‘उंदीर’ बिळात  लपले होते.  भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. बाबरी पडल्यानंतर जेव्हा दंगल झाली त्यावेळी आमची सत्ता नसतानाही आम्ही मुंबई वाचवली. बाबरी मशिद पडल्यानंतर जेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले होते जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. तेव्हा हे सगळे उंदीर लपुन बसले होते आणि आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरही निशाणा साधला. अजून किती दिवस तुम्ही भाजपचे तळवे चाटत राहणार? बाळासाहेबांचा, शिवसेनेचा हा अपमान तुम्ही कसा सहन करू शकता?? असा सवाल करत एकतर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा तुम्हीच स्वतः मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हा अस म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केलाय.