उदगीर विधानसभा मतदारसंघात निकाल असा लागतोय | संजय बनसोडे Vs सुधाकर भालेराव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म आमदार राहिले… भाजपला मतदारसंघात बेस बनवून दिला… निष्ठा राखली… पण शेवटी पदरी पडली निराशाच… ही खंत आहे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची… 2019 ला तिकीट कापल्यामुळे भालेराव उदगीरच्या राजकारणात मागे राहिले… आणि राष्ट्रवादीचे स्टॅंडिंग आमदार संजय बनसोडे यांचं राजकारण पहिल्याच टर्ममध्ये इतकं मोठं झालं… की भालेरावांना पक्षासोबतची निष्ठा बाजूला ठेवून अखेर शरद पवारांची तुतारी हाती घ्यावीच लागली… आणि याच एका गोष्टीमुळे उदगीरच्या येणाऱ्या विधानसभेला इंटरेस्टिंग वळण आलंय…. संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशी आमदारकीला लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स झालं असून दोघांनाही इथून जिंकण्याचे सध्या फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत… त्यामुळे भालेराव 2019 मध्ये झालेल्या तिकीट कापून झालेल्या अपमानाचा वचपा यंदा काढणार का? की संजय बनसोडे सत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणणार? तेच क्लियर कट सांगतोय…

मुस्लिम बहुल असणाऱ्या उदगीरवर तसा आर्य समाजाचा मोठा प्रभाव… इथं उमेदवार कोण असतो? यापेक्षा तो कोणत्या जातीचा असतो? यावर उदगीरच्या राजकारणाची समीकरणे ठरतात… मतदार संघाची नव्यानं आखणी करण्यात आल्यानंतर उदगीर अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… आणि तेव्हापासूनच तो भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला… कर्नाटक – तेलंगणा या राज्यांना जोडून असल्यामुळे उदगिरीची संस्कृती संमिश्र आहेच… पण त्यापेक्षाही जास्त या मतदारसंघावर हिंदुत्वाचा मोठा पगडा पाहायला मिळतो… राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं काम मतदारसंघात खोलवर झिरपलय… संघाचा स्ट्रॉंग केडर बेस असल्यामुळेच भाजपला उदगीरची जागा सेफ झाली… सुधाकर भालेराव यांनी 2009 आणि 2014 ला लागोपाठ दोन्ही निवडणुकांत आमदारकीचा गुलाल उधळून उदगीरमध्ये भाजपला चांगला जम बसवून दिला… पण भाजपमध्ये सारं काही आलबेल नव्हतं… पक्षांतर्गत नाराजी, धुसपुस, गटबाजी वाढली होती… याचा फटका हमखास 2014 ला बसणार अशी चिन्ह होती… पण मोदी लाटेनं तारुण नेलं… आणि सलग दुसऱ्यांदा भालेराव आमदार झाले…

YouTube video player

भालेरावांना भिडणं अवघड आहे हे माहीत असूनही राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे प्रत्येक टर्मला त्यांना भिडत होते…. 2009, 2014 असे सलग दोन पराभव पचवूनही बनसोडेंनी हार मानली नाही… याउलट जनतेशी असणारा कनेक्ट त्यांनी वाढवत नेला… लोकांच्या अडीनडीला, दुःखाला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची इमेज इस्टॅब्लिश झाली…आणि अशातच उजाडली 2019 ची रणधुमाळी… अर्थात स्टॅंडिंग खासदार असल्यामुळे युतीकडून भाजपच्या सुधाकर भालेरावांनाच तिकीट मिळणार हे जवळपास कन्फर्म होतं… पण इथेच मोठा ट्विस्ट झाला.. भाजपने भालेरावांचं तिकीट कापून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली… यामुळे नाराज झालेल्या भालेरावांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला… पण अखेर समजूत काढण्यात आल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली… पण कणाकणानं राजकारण मजबूत करत आणलेल्या संजय बनसोडेंनी या टर्मला मात्र भाजपला दणका दिला… आणि दणक्यातच आमदारकी खेचून आणली…

अर्थात भालेराव नाराज असणं, भाजपमधील अंतर्गत गटातटाच राजकारण यामुळे पक्षाने स्वतःच्या हाताने मतदार संघातील राजकारणावर धोंडा पाडून घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही… पण संजय बनसोडे आमदार झाले काय की लागलीच उदगीर मतदारसंघ फ्रंटला आला… ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री…. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत गेल्यानंतर महायुतीत क्रीडामंत्री पदाचा कारभार सध्या बनसोडे सांभाळतायत…. एवढेच काय तर परभणीचं पालकमंत्रीपदाची जबाबदारीही खांद्यावर असल्यानं संजय बनसोडे या नावाला आपोआपच वजन प्राप्त झालं… महायुतीतील नेत्यांकडून आणि खास करून दादांकडून त्यांना बरीच ताकद देण्यात आली…. सरकारमधील त्यांची वाढलेली पत पाहता येणाऱ्या विधानसभेला कितीही आपटली तरी संजय बनसोडेंनाच उदगीरचं तिकीट मिळणार हे ध्यानात आल्यानं शेवटपर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या सुधाकर भालेरावांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली… त्यामुळे महायुती वर्सेस महाविकास आघाडी…घड्याळ वर्सेस तुतारी… संजय बनसोडे वर्सेस सुधाकर भालेराव अशीच लढत उदगीरमध्ये पाहायला मिळणार, अशी सध्या स्थिती आहे….

विद्यमान आमदार बनसोडे साहेबांचं रिपोर्ट कार्ड पाहायचं झालं तर पहिल्याच टर्ममध्ये सत्तेत राहिल्याने त्यांनी अनेक विकास कामांसाठी भरीव निधी उदगीरमध्ये आणला… अनेक कामं मंजूर करून ती सध्या पाईपलाईनमध्येही आहेत… पण रस्त्यांची झालेली चाळण, रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणारे बेरोजगारांचे लोंढे, धान्याचे कोठार असूनही प्रक्रिया उद्योगांची असणारी कमतरता, रस्ते – पाणी – वीज – आरोग्य या सगळ्याचीच हेळसांड असल्याने आमदारांना प्रचाराच्या काळात या प्रश्नांवरून जनतेला तोंड द्यावं लागणार आहे… सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदगीरला जिल्हा बनवण्याचं जे मतदारांना स्वप्न दाखवलं होतं, त्याचं पुढे काय झालं? यावरही जनता बनसोडेंची खरडपट्टी केल्याशिवाय राहणार नाही….

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला चार हजारांचं लीड मिळालय… त्यामुळे काठावर का होईना, पण बनसोडे सेफ झोन मध्ये आहेत… बाकी मुस्लिम – दलित मतं, शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि भाजपची अंतर्गत अस्वस्थता हे सगळं सुधाकर भालेराव यांच्याच पथ्यावर पडणार आहे… त्यामुळे घड्याळाकडून संजय बनसोडे तर तुतारीकडून सुधाकर भालेराव असा अटीतटीचा, फिफ्टी-फिफ्टी सामना उदगीरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे….बाकी उदगीरमध्ये बनसोडे आमदारकी कायम ठेवतात की भालेराव डावलण्यात आल्याचा वचपा काढणार? हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहेच… ऐकून विश्लेषणावरून उदगीर चा आमदार कोण होईल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं?