हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतात. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि साक्षर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतात. अशातच सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्याचा फायदा सगळ्या महिलांना होणार आहे. या योजनेचे नाव उद्योगिनी योजना असे आहे. या महिला केंद्राच्या उद्योगिनी योजना अंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. आणि त्यामुळे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येतो. यामध्ये जवळपास 88 प्रकल्पांचा समावेश केलेला आहे. जर महिलांना लघुउद्योग करायचा असेल, तर त्यांच्यासाठी ही उद्योगिनी योजना अत्यंत फायद्याची आहे. आता ही योजना नक्की काय आहे? त्याबद्दलचे नियम आणि अटी जाणून घेणार आहोत.
उद्योगीनी योजना कशी आहे?
उद्योगिनी ही केंद्र सरकारची योजना आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा भाग आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत होईल. तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. आणि एक उद्योजिका म्हणून नाव कमावता येईल. ही योजना केंद्राच्या महिला व बालविकास कल्याण कडून राबविण्यात येते.
या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना 3 लाख रुपयांचे कर्ज मिळते. यासाठी महिलांच्या घरातील वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपये यांच्या आत असणे गरजेचे आहे. तसेच विधवा आणि दिव्यांग महिलांसाठी कोणत्याही प्रकारची अट देण्यात आलेली नाही. त्यांना थेट व्याज मुक्त कर्ज दिलं जातं. तसेच इतर महिलांना 10 ते 12 टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी महिलेचे वय हे 18 ते 55 वयोगटातील असणे गरजेचे आहे. जी महिला या योजनेअंतर्गत कर्ज घेणार आहे. सगळ्यात आधी तिचा सिबिल स्कोर तपासण्यात येतो. तिचा जर सिबिल स्कोर चांगला असेल, तरच त्या महिलेला कर्ज दिले जाते.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रे सबमिट करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचे दोन फोटो, जन्माचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. तसेच तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती हवी असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.