लंडन । कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये बरेच महिने लॉकडाउन होता. या काळात तेथील हॉटेल व्यवसाय कोलमडून पडला आहे. या उद्योगाला सावरण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. यूकेमधील ५३ हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेसना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांचे हॉटेलमधील खानपानाचे ५० टक्के बिल सरकार भरणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
‘इट आऊट टू हेल्प आऊट’ या योजनेतंर्गत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सोमवार ते बुधवारपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्याव्यतिरिक्त अन्य पेयांवर ५० टक्के सवलतीपासून प्रतिव्यक्ती १० पाऊंडापर्यंत सवलत मिळणार आहे. पार्सलधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
“आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये हॉटेल्स, कॅफे आणि बार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. १० लाखापेक्षा जास्त लोक या उद्योगात काम करतात. त्यांना करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू” असे ऋषि सनक यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेसमध्ये यावे आणि या क्षेत्रातला रोजगार टिकून रहावा यासाठी यूके सरकारने ही अभिनव योजना आणली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”