भूमिगत पाईप लाईन अचानक फुटली अन्… पहा थरकाप उडवणारा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा विडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अचानकपणे जमिनीखालील पाईपलाईन फुटून पाण्याचा मोठा फवारा रस्त्यावर उडाल्याचा दिसत आहे. यावेळी रस्त्यावरून जात असलेली मुलगी या घटनेत जखमी झाली आहे. ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याचे दिसत आहे.

ही घटना महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आहे. येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील माईंदे चौक ते हिंदी हायस्कूल रस्त्यावरील जलवाहिनी फुटली. यावेळी प्रेशर इतकं जास्त होत की रस्त्याचा एक भाग जमिनीतुन उखडून सुमारे दाेन फुट हवेत उडाला. तसेच पाण्याचा फवारा रस्त्याच्या दुभाजकापर्यंत गेला. अचानक जलवाहिनी फुटल्यामुळे लाखाे लिटर पाणी यावेळी वाया गेले आहे.

सोशल मीडियावर हा थरारक विडिओ व्हायरल झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्याचवेळी एक मुलगी तेथून गाडीवरून जात होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुलीचे स्कूटीवरील नियंत्रण सुटले आणि ती घसरून खाली पडली. या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली. सुदैवाने त्यावेळी संपूर्ण रस्ता मोकळा होता अन्यथा अजून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.