पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी रॅलीदरम्यान तृणमूल काँग्रेस तसेच भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपाचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.