हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात UPI (Unified Payments Interface) सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या प्रमुख डिजिटल पेमेंट अॅप्स काम करत नाहीत. लाखो युजर्सना पेमेंटसंदर्भात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी ऑनलाइन आउटेज ट्रॅक करणाऱ्या वेबसाइट Downdetector ने पुष्टी केली आहे की, दुपारी १२ वाजल्यापासून UPI सेवा ठप्प झाली आहे. या अचानक बंदीमुळे सोशल मिडियावर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करत व्यवहार अयशस्वी झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
नागरिकांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांनाच याचा फटका –
यूपीआय सेवा ठप्प झाल्याचा फटका बँकिंग सेवांनाही बसला आहे. SBI, HDFC आणि ICICI बँका यांच्याशी संबंधित युजर्सकडूनही तक्रारी येत आहेत की, व्यवहार पूर्ण होत नाहीत. याचा सर्वाधिक फटका दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे या शहरांना बसल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे.
परिणाम थेट व्यवहारांवर आणि अर्थव्यवस्थेवर –
आज देशातील कोट्यवधी लोकांचा UPI वर अवलंब आहे. चहाच्या टपरीपासून ते मॉलमधील खरेदीपर्यंत, रोख रकमेपेक्षा UPI व्यवहार अधिक प्रचलित झाले आहेत. त्यामुळे या सेवेत अडथळा आल्यास, त्याचा परिणाम थेट व्यवहारांवर आणि अर्थव्यवस्थेवर होतो.
यामागचं कारण काय –
या बिघाडामागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वीही अशीच समस्या निर्माण झाली होती, तेव्हाही कारण तांत्रिक अडचणीचं होतं. सध्या युजर्स आणि व्यापारी वर्ग सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरणाची वाट पाहत आहेत.