हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आइस्क्रीम (Ice Cream) हा अनेकांचा आवडता पदार्थ… लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकजण आवडीने आइस्क्रीम खातात. खास करून उन्हाळ्यात गर्मीच्या कडाक्यात आइस्क्रीम खाल्ल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही सुद्धा यंदाच्या उन्हाळ्यात खूप वेळा आइस्क्रीम खाल्लं असेल. परंतु आता याच आइस्क्रीम बाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आइस्क्रीम बनवण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कर्नाटकात हि घटना घडली असून अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने 97 दुकानदारांवर कडक कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्नाटकातील अन्न विभागाने आइस्क्रीम, आइस कँडी आणि कोल्ड्रिंक्स बनवणाऱ्या जवळपास अर्ध्या युनिट्सना निकृष्ट दर्जाच्या वस्तू विकल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. विभागाने २२० पैकी ९७ दुकानांना नोटिसा बजावल्या आहेत. काही दुकानांना वस्तू व्यवस्थित न साठवल्याबद्दल इशाराही देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काहीजण कोल्ड्रिंक्समध्ये डिटर्जंट पावडर मिसळून आइस्क्रीम क्रिमी बनवत होते आणि हाडे कमकुवत करणारे फॉस्फोरिक अॅसिड बनवत होते, असे तपासात समोर आले. विभागाने एकूण ३८,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे
तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांना काही ठिकाणी उत्पादनांसाठी अस्वच्छ आणि खराब साठवणुकीच्या सुविधा आढळल्या. अनेक प्रकरणांमध्ये, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी डिटर्जंट, युरिया किंवा स्टार्चपासून बनवलेले कृत्रिम दूध वापरले जात होते. चव आणि रंग वाढवण्यासाठी नैसर्गिक साखरेऐवजी सॅकरिन किंवा अनधिकृत रंगांसारखे हानिकारक पदार्थ वापरले जात होते. बहुतेक युनिट्स बर्फाच्या कँडी आणि पेयांमध्ये स्वच्छ पाणी वापरत नसल्याचे किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात फ्लेवरिंग एजंट्स घालत असल्याचे देखील लक्षात आले. ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे स्वाद, आवश्यक वस्तू आणि रंग बहुतेकदा मान्यताप्राप्त किंवा मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून खरेदी केले जात नाहीत. विभागाने ५९० एस्टेब्लिशमेंट चा समावेश असलेल्या रेस्टॉरंट्स, मेस आणि हॉटेल्सची तपासणी देखील पूर्ण केली. २१४ हॉटेल्समध्ये योग्य कीटक नियंत्रण उपाययोजना न केल्याचे आढळून आले, ज्यामुळे १,१५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.