माढ्यात मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी आश्वासन देऊनही उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभेसाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) आणखी एक डाव टाकला आहे. २ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतलेले उत्तम जानकर (Uttam Jankar) हे आज शरद पवारांच्या भेटीगाठी दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासह भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असं बोललं जात आहे.

उत्तम जानकर हे भाजपकडून सोलापूर लोकसभा लढवण्यास इच्छुक होते, मात्र भाजपचे सोलापुरातून माळशिरसचे आमदार राम सातपुते याना तिकीट दिल्याने जानकर हे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमान पाठवून उत्तम जानकर, शहाजी पाटील, रणजित निंबाळकर, आणि जयकुमार गोरे याना तातडीने नागपूरला बोलावलं होते. यावेळी पार पडलेल्या बैठकीत फडणवीसांनी जानकर यांना आमदारकीचे आश्वासन दिले असल्याचं सांगितलं होतं. विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ असं आश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं उत्तम जानकर यांनी सांगितलं होतं. मात्र यानंतरही आज जानकर हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता उत्तम जानकर पवारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेणार आहेत आणि 19 एप्रिलला आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. उत्तम जानकर यांना आगामी विधानसभा निवडणुक माळशिरसमधून लढवायची आहे. माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची गरज आहे. तर, माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना उत्तम जानकर यांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे जानकर यांच्या निर्णयाचा मोठा परिणाम माढ्याच्या राजकारणावर होणार आहे.