वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले सूचक संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील सर्वच पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीचे वृत्त समोर आले होते. यावर आता पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केले आहे. यावेळी, आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे सुचक संकेत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि त्यांच्यामध्ये झालेल्या भेटीसंदर्भात भाष्य केले. पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात काही अर्थ राहिला नाही. त्यामुळे इथून पुढे वारंवार भेटीगाठी होत राहणार आहे. भेट झाली तर निश्चितपणे आपल्याला सांगेल”

अजून तरी दार बंद आहेत…

त्याचबरोबर, इंडिया आघाडीतील प्रवेशासंदर्भात बोलताना, “इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे. आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षात देशाला कसं खोकलं केलेले आहे याचा आराखडा आम्ही मांडू” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले.

दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर मात करण्यासाठी 28 पक्षाची एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला अद्याप घेण्यात आलेले नाही. गेल्या काही काळापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेने सोबत म्हणजेच उद्धव ठाकरे गटाशी युती केली आहे. मात्र अद्याप त्यांना इंडिया आघाडीत प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला इंडियामध्ये स्थान मिळेल काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.