Vande Bharat Express : संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचा डंका आहे. या ट्रेन देशभरातल्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. म्हणूनच या ट्रेनला देशाच्या विविध भागांमधून मागणी वाढत आहे. आता लवकरच मुंबई -कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. यामध्ये मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या दोन रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस (Vande Bharat Express) राज्यातील मुख्य शहर मुंबईला जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी या मार्गावर वंदे भारत सुरु केल्यानंतर मुंबई-कोल्हापूर वंदे भारत सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
आंबाबाईचे दर्शन होणार सुलभ
प्रवाशांच्या मागणीला आता यश आले असून मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे आता साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन सुलभ होणार आहे. शिर्डी, सोलापूरच्या माध्यमातून (Vande Bharat Express) तुळजापूर, अक्कलकोटसारखी देवस्थांना वंदे भारतच्या माध्यमातून वेगवान कनेक्टीव्हिटी मिळाल्यानंतर आता कोल्हापूरचाही यामध्ये समावेश होणार असल्याने ही सेवा भाविकांसाठी फार फायद्याची ठरणार आहे.
पुणे- वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)
याबरोबरच पुणे ते वडोदरा मार्गावर वंदे भारत चालवली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यान बुलेट ट्रेन आधी सर्वात जलद ट्रेन म्हणून पुणे-वडोदरा मार्गावर वंदे भारत चालवली जाणार आहे. पुणे- वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही वसई रोड मार्गे धावेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या दोन्ही गाड्या सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रतुन सर्वाधिक ८ वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. सध्या महाराष्ट्रात ६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.