हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Vande Bharat Express ही अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन ठरली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आरामदायी होत आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यन्त तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. आता देशाची उपराजधानी नागपूर आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता आहे.
कसा असेल रूट –
पुणे आणि नागपूर मध्ये वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) सुरु आहे. मात्र असे जरी असले तरी पुण्यावरून थेट वंदे भारत ट्रेन सुरु व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. सध्या मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणारी गाडी पुणेमार्गे धावते. परंतु पुण्यावरून थेट अशी वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही. याच पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंचाने सोलापूर ते नागपूर, सोलापूर ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद अशा ३ वंदे भारत सुरु करण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता या तिन्ही मार्गावर वंदे भारत धावते का ते पाहायला हवं. असं झाल्यास पुणे, नागपूर आणि सोलापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी असेल.
महाराष्ट्रात एकूण 7 मार्गांवर धावते वंदे भारत- Vande Bharat Express
देशामध्ये वंदे भारतची (Vande Bharat Express) मागणी वाढल्यामुळे प्रयेक ठिकाणी ती असावी असे प्रवाश्यांना वाटत आहे. सध्या देशामध्ये एकूण 41 वंदे भारत रुळावर धावत आहेत. त्यामधील एकूण सात मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. ज्यामध्ये मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
रेल्वेकडून केला जातोय पाठपुरावा
पुणे, नागपूर आणि सोलापूर या मार्गांवर वंदे भारत चालवली जावी अशी मागणी केली जात आहे. मात्र या तिन्ही भागांना याआधीच वंदे भारत मिळाली आहे. ज्यामध्ये सोलापूर आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई ते सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. सध्या पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर शताब्दी एक्सप्रेस चालवली जात आहे. त्यामुळे ही गाडी बंद करून वंदे भारत गाडी चालवली जावी यासाठी मध्य रेल्वेकडून पाठपुरावा केला जात आहे.