Vande Bharat Sleeper : भारतीय रेल्वेच्या प्रवासात आता आणखी एक ऐतिहासिक अध्याय जोडला जात आहे. देशातील लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस आता फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीच्या प्रवासासाठी सुद्धा उपलब्ध होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-पुणे हे महत्त्वाचे मार्ग समाविष्ट आहेत.
रात्रीचा प्रवास आता वंदे भारतसह (Vande Bharat Sleeper)
या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित रात्रीचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. यामुळे देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासात एक नवे युग सुरू होणार आहे. या ट्रेनच्या डिझाइनपासून ते सुविधांपर्यंत सर्व काही आधुनिक आणि जागतिक दर्जाचे असणार आहे.रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, बीईएमएल (BEML) ही कंपनी या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी जबाबदार असेल. यावर्षी अखेरपर्यंत रेल्वे बोर्डकडून अंतिम मंजुरी मिळणार असून, गाड्यांचे उत्पादन युद्धपातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्रातील कोणते मार्ग होणार लाभार्थी?
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-इंदूर या मार्गांवर वंदे भारत चालते. आता या मार्गांमध्ये आणखी दोन गाड्यांची भर पडणार आहे. तसेच, पुणे शहरातून देखील रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार नव्या वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहेत.
‘फील’ होईल प्रीमियम
- स्टील स्ट्रक्चर: या गाड्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलच्या बनावटीतील असणार आहेत, ज्यामुळे अधिक मजबूत आणि सुरक्षित प्रवास शक्य होईल.
- प्रगत तंत्रज्ञान : क्रॅश सेफ्टी तंत्रज्ञान वापरले जाणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित बनणार आहे.
- वास्तविक सोयी: एकूण १६ डब्यांची रचना असणार असून, सुमारे ८२३ प्रवाशांसाठी बसण्याची व झोपण्याची सोय असेल.
- वर्गवारी : फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी या सुविधा असणार आहेत.
वंदे भारत स्लीपर प्रकल्पाचे निर्माते कोण?
या स्लीपर गाड्यांचे उत्पादन तीन प्रमुख कंपन्या करत आहेत . यातील पहिली म्हणजे BEML (बीईएमएल) ,दुसरी काइनेट रेल्वे सॉल्यूसन्स लिमिटेड, तिसरी टिटागड रेल्वे सिस्टम्स लिमिटेड आणि भेल यांचा संयुक्त उपक्रम या कंपन्यांकडून एकूण २१० वंदे भारत स्लीपर ट्रेन भारतीय रेल्वेला मिळणार आहेत.
भारतातील रेल्वे प्रवासात नवे युग
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या आगमनाने भारतात रेल्वे प्रवास अधिक गतीशील, आरामदायक आणि आधुनिक होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील प्रवाशांना आता गुणवत्तेच्या आणि सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. आगामी काळात देशांतर्गत प्रवासाचा चेहराच या नव्या गाड्यांमुळे बदलणार, हे नक्की! चला तर मग, वंदे भारत स्लीपरसाठी सज्ज व्हा ! एक प्रीमियम प्रवास अनुभवण्यासाठी !




