Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे. देशातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस यशस्वीपणे देशभरात धावत असतानाच, आता तिच्या स्लीपर व्हर्जनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वंदे भारत स्लीपर ट्रेन केवळ उत्तर भारतातील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही मोठा दिलासा देणार आहे. मुंबई ते नागपूर आणि दिल्ली ते हावडा या दोन महत्त्वाच्या रेल्वेमार्गांवर ही उच्च-गती स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत (Vande Bharat Sleeper Train) दाखल होणार आहे. त्यामुळे दीर्घ प्रवास अधिक वेगवान, आरामदायक आणि दर्जेदार होणार आहे.
दिल्ली-हावडा मार्गावर धावणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन
मिळालेल्या माहितीनुसार, 1449 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-हावडा मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. सध्या या मार्गावर राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेस चालतात, पण वंदे भारत स्लीपर त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने म्हणजे 160 किमी/तास इतक्या वेगाने धावणार आहे. ही ट्रेन संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीहून सुटेल आणि सकाळी 8 वाजता हावडा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात हावडाहून संध्याकाळी 5 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दिल्लीला पोहोचेल.
प्रमुख स्थानकांवर थांबे
ही सुपरफास्ट स्लीपर ट्रेन प्रवासदरम्यान कानपूर सेंट्रल, प्रयागराज, डीडी उपाध्याय जंक्शन, गया, धनबाद आणि आसनसोल या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
तिकीट दर काय असणार?
मीडिया रिपोर्टनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे संभाव्य तिकीट दर पुढीलप्रमाणे असू शकतात—एसी 3-टायरसाठी सुमारे 3000 रुपये, एसी 2-टायरसाठी 4000 रुपये, तर फर्स्ट क्लास एसीसाठी 5100 रुपये. हे दर राजधानी किंवा दुरांतो एक्सप्रेसच्या तुलनेत थोडे अधिक असले तरी सुविधांच्या बाबतीत वंदे भारत स्लीपर अधिक प्रगत असेल.
मुंबई-नागपूर स्लीपर वंदे भारत
वंदे भारत स्लीपर ट्रेनची आणखी एक महत्वाची लिंक म्हणजे मुंबई ते नागपूर मार्ग. हा मार्ग प्रवाशांमध्ये नेहमीच वर्दळीचा असून, सरकारी, निमशासकीय व खासगी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचा रेल्वेचा विचार असून, या निर्णयामुळे प्रवाशांना जलद व आरामदायी पर्याय मिळणार आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे विचाराधीन असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे देशातील दीर्घ प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे तर अधिक आरामदायक, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे. देशाच्या प्रगतीच्या मार्गावर रेल्वे व्यवस्थेचा हा एक मोठा टप्पा ठरणार आहे. दिल्ली-हावडा आणि मुंबई-नागपूर प्रवाशांसाठी हा निश्चितच ‘वंदनीय’ अनुभव ठरणार आहे.