Pune Accident : पुण्यात Vanity Van ची 5-6 गाड्यांना धडक; 2 ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. शहरातील उंड्री चौकात एका Vanity Van ने 5-6 गाड्यांना धडक दिली. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला. काल २१ मे ला रात्री हा विचित्र अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन व्हॅनिटी वॅनच्या चालकास ताब्यात घेतलं.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पॅलेस ऑर्चर्ड सोसायटी, एनआयबीएम-उंद्री रोड, कोंढवा येथे हा अपघात झाला. व्हॅनिटी वॅन (एमएच 12 एचबी 0242) ही उतारावरून वेगात येत होती. त्या वेळी गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि अन्य वाहनांवर धडकली. या धडकेत रिक्षा, कार, दुचाकी या वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी व्हॅनिटी वॅनचा चालक मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.