Wednesday, March 29, 2023

वसंतगड- तळबीड रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा : खा. श्रीनिवास पाटील

- Advertisement -

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वसंतगड ते तळबीड, वराडे, हनुमानवाडी, शिवडे या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. या मार्गामुळे तासवडे टोलनाक्यामधून नागरिकांची सुटका होणार असून वाहनांचा 26 किलोमीटराचे अंतरही वाचणार आहे. सदर रस्त्याचा दर्जा सुधारल्यामुळे परिसराचा विकास होण्यासह, पर्यटन वाढ व दळणवळणाला गती प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.

खा. श्रीनिवास पाटील यांनी सदर रस्त्याला दर्जोन्नत करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे करून यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यानुसार रा. म. मा. 166 ई वसंतगड ते तळबीड, वराडे, हनुमानवाडी, शिवडे या 12.500 कि.मी. रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यास मंजूरी मिळाली आहे. यामध्ये रा. म. मा. 166 ई वसंतगड बसस्टॉप ते तळबीड रस्ता ग्रा. मा. 88 लांबी 5 कि.मी., तळबीड ते वराडे रस्ता ग्रा. मा. 78 लांबी 5 कि.मी., शिवडे, हनुमानवाडी ते वराडे रस्ता ग्रा. मा. 57 लांबी 2.500 कि.मी. अशी रस्त्याची सुधारणा होणार आहे. ह्या रस्त्याची सुधारणा झाल्यास अनेक फायदे होणार असून यामध्ये गुहागर-विजापूर राज्यामार्ग व मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे परस्परांमधील अंतर कमी होऊन एकमेकांशी जिल्हा मार्गाने जोडले जातील. परिसरातील सुपने, वसंतगड, तांबवे ह्या प्रमुख गावांसह कोयना खोरे उंब्रज, तासवडे, तळबीड परिसराचे कृष्णा खोरे ही दोन खोरी सुद्धा एकमेकांशी जोडली जातील. याशिवाय ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ले वसंतगडचा सर्वागीण विकास होण्यास मदत होणार आहे. तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ, चाफळचे श्री राम मंदिर, वसंतगड येथील सद्गुरू जनार्दन महाराज मठ, रा. रा. जोशी महाराज मठ व पुरातन जोमलिंग तीर्थक्षेत्र आदी ठिकाणांना भेटी देण्यास पर्यटकांना सोयीचे होणार आहे.

- Advertisement -

तसेच औद्योगिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या तासवडे एमआयडीसी, सहयाद्रि साखर कारखाना येथे कामानिमित्त ये-जा करणा-या असंख्य नागरिकांना हा मार्ग कमी अंतराचा व सोयीचा ठरणार आहे. तर उंब्रज, वसंतगड, साकुर्डी पेठ, तांबवे, सुपने येथील शेती, व्यापार, उद्योग, आरोग्य, शिक्षणाला चालना मिळणार आहे. वसंतगड, तांबवे, सुपने परिसरातील लोकांना सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरिता सुमारे 26 कि. मी. ने अंतर कमी होणार असून त्यांची तासवडे टोलमधून कायम स्वरूपी सुटका होणार आहे. सदर रस्ता जिल्हामार्ग झाल्याने दोन राज्यमार्ग एशियन हायवेला कायमस्वरूपी जोडले जाणार आहेत. हा मार्ग एकप्रकारे स्थानिकांसाठी वरदान ठरणार आहे.