साताऱ्याचे वीर जवान मयूर यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव (वय 29) यांचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्यावर काल वडूज येथील एस टी डेपोच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शासनाच्या वतीने वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आर. एम. जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक, लोक प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व वडूज पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारासोबत जात असताना स्पीड ब्रेकरवरून जवान मयुर जयवंत यादव हे खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जवान मयुर यादव यांचे पार्थिव मंगळवारी वडूजमध्ये आणण्यात आले. या याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.