पुणे | अमित येवले
आचार्य अत्रे लिखीत ‘मोरूची मावशी’ ह्या नाटकावर आधारित केलेल्या अप्रतिम अभिनयाने घरात घरात पोहचलेलेआणि यंदाचा व्ही. शांताराम पुरस्काराचे मानकरी ठरलेले विजय चव्हाण यांनी आज या जगाचा निरोप घेतला. मोरूची मावशी या नाटकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन हे दोघे सहकलाकारही होते, मात्र या सर्वांमध्ये लक्षात राहिले ते फक्त विजय चव्हाण. कारण त्यांच्या वाट्याला आलेली स्त्री भूमिका म्हणजे मोरूच्या ‘मावशीची’ भूमिका त्यांनी त्यांच्या अभियानाने अजरामर केली.
गेली ४० वर्षाहुन अधिक काळ चव्हाण यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका यामध्ये भरभरुन योगदान दिले. जवळपास ४०० हुन अधिक चित्रपटात चव्हाण यांनी काम केले आहे. सहकलाकार सुद्धा किती महत्वाचा असतो हे त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटातून दाखवून दिले होते. खरतर चव्हाण नसते तर “गणपत” ही हाक गाजली नसती,
“मोरूची मावशी” ही सजली नसती, “एक डोळा बंद करून जीभ चावायच्या” त्यांच्या ह्या अफलातून अभिनयावर टाळीही वाजली नसती. त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला एक ओळख निर्माण करुन दिली होती. मग ती पछाडलेला चित्रपट असो की जत्रा मधील कान्होले असो… असे अनेक पात्र हे लोकांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरत.
विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं. मोरूची मावशी नंतर चव्हाण यांना ‘तू तू मी मी’ हे नाटक मिळालं. या नाटकात तर त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला त्यांनी योग्य साकारण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. सदर पात्र हे अजून बहादर होण्यासाठी ते अक्षरशः त्या पात्रासाठीची वेशभूषा परिधान करुन ते रंगभूमीवर पुन्हा यायचे. त्यांनी कायमच नवनविन भूमिकेत आपली स्वतःची स्वत्रंत अशी ओळख निर्माण केली होती.
४० वर्षे चित्रपट क्षेत्रात काम करतांना त्यांनी अनेक बदल त्यांच्या कारकिर्दीत बघितलेत, जुन्या पिढी पासून तर आताच्या नव्या पिढीचा त्यांनी अनुभव घेतला, परंतु त्यांनी या प्रवासात कसलाही वाद कधी ओढवून घेतला नाही. ‘वहिनीची माया’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटा पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केल आणि बघता बघता ते आज महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ते पोहचलेे आणि आपल्या अभिनयाने गाजवलेल्या अनेक भूमिकांमधून ते निश्चितपणे चाहत्यांच्या स्मरणात भविष्यात राहणार आहेत.
आज त्यांच्या जाण्याने सोशल मिडिया वरुन त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली व्हायली. यामध्ये तरुण चाहत्यांची संख्या लक्षणीय होती. सहकलाकाराचे पात्र खऱ्या अर्थाने मोठे करणारा या मराठी सृष्टितील ताकदीच्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
विजय चव्हाण यांच्या एकूण यशस्वी कारकिर्दीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप
गाजलेली नाटकं
● मोरुची मावशी
● कार्टी प्रेमात पडली
● लहानपण देगा देवा
● तू तू मी मी
● श्रीमंत दामोदर पंत
गाजलेले चित्रपट
● वहिनीचा माया (पहिला चित्रपट)
● घोळात घोळ
● धुमाकूळ
● शेम टू शेम
● माहेरची साडी
● बलिदान
● शुभमंगल सावधान
● एक होता विदूषक
● माझा छकुला
● चिकट नवरा
● धांगडधिंगा
● पछाडलेला
● अगंबाई अरेच्चा
● जत्रा
● चष्मे बहाद्दर
● इश्श्य
● जबरदस्त
● बकुळा नामदेव घोटाळे
● वन रुम किचन