विजय शिवतारे 12 तारखेला बारामतीतून अर्ज भरणार; दोन्ही पवारांचे टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर (Baramati Lok Sabha Election) ठाम आहेत. १२ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवतारेंच्या या निर्णयानंतर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध विजय शिवतारे असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे.

आज पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, मी १२ एप्रिलला १२ वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार आहे आणि प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे. पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे. हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत, मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे असेही त्यांनी म्हंटल. माझी लढाई म्हणजे जन सामन्यांची लढाई आहे असं म्हणत आपण 1 तारखेला सभा घेणार आहोत अशी माहिती शिवतारेंनी दिली.

अजित पवारांचे राजकारण हे स्वार्थी राजकारण आहे तर सुप्रिया सुळे यांनी बारामतीत २ टक्केही विकासकामे केली नाहीत असं म्हणत शिवतारेंनी हल्लाबोल केला. राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. ४ जूनला निकालाच्या दिवशी जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात ते सर्वांसमोर येईल असं म्हणत विजय शिवतारेंनी अजित पवारांना खुलं आव्हान दिले आहे.