विजय शिवतारेंचे बंड पडले थंड!! अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमती बाजू घेतली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विजय शिवतारे हे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर बारामती मतदारसंघावर पवारांची मालकी नाही असे म्हणत विजय शिवतारे यांनी बारामतीतून उभे राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पेटली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीमध्ये शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अखेर आज शिवतारेंनी बारामती मतदारसंघाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. आपण पुढच्या पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे यावेळी शिवतारे यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे, बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा शिवतारे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून ते शंभूराज देसाई यांच्यासह अनेकांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सर्वांचे हे प्रयत्न असफल ठरले. त्यामुळेच बारामतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि शिंदे गटाकडून विजय शिवतारे अशी लढत पाहायला मिळेल हे निश्चित झाले होते.

दरम्यान, बऱ्याच प्रयत्नानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विजय शिवतारे यांची समजूत काढण्यात यश आले आहे. त्यामुळेच आता विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीत आता सुनेत्र पवार विरोधात सुप्रिया सुळे असा सामना पाहायला मिळणार आहे. तसेच बारामती मतदारसंघातून शिवतारे यांचा पत्ता कट झाल्यामुळे शिंदे गटातील आणि अजित पवार गटातील वाद देखील निवळणार आहे.