जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता वाढली, पण देसाई कारखाना मुडदूस झालेल्या अवस्थेत; माजी मंत्री पाटणकरांची शंभूराज देसाईंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापण झालेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात राजकीय अड्डा व स्थानिकांची गळचेपी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील जुन्या सर्व कारखान्यांची गाळप क्षमता दहा-बारा हजार मेट्रिक टन झाली असताना मात्र देसाई कारखाना मुडदूस झालेल्या अवस्थेत १२५० मेट्रिक टनावरच सुरू असल्याची खरमरीत टीकाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे.

पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या पहिल्या रोलरचे पूजनप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यजितसिंह पाटणकर होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादी पाटण विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ शेलार, टाटा मोटर्स कामगार युनियनचे नेते सुजीत पाटील, दुध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव क्षीरसागर उपस्थित होते.

माजी मंत्री पाटणकर म्हणाले, स्थानिक गोरगरीब शेतकऱ्यांच्या उसाला न्याय मिळावा, बेरोजगार युवकांना रोजगार, व्यवसाय निर्माण व्हावा, या हेतूने सत्यजितसिंह पाटणकर यांनी या साखर कारखान्याचे शिवधनुष्य धाडसाने हातात घेतले आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपल्याच हक्काचा हा साखर कारखाना लवकरात लवकर कार्यरत होण्यासाठी सहकार्य करावे. भविष्यात येथे इथेनॉल, बगॅसमधून वीजनिर्मिती यासारखे पूरक प्रकल्पही राबवण्याचा मनोदय आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान गहाण टाकू देणार नाही.

शेजारच्या तालुक्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता १० ते १२ हजार मेट्रिक टनापर्यंत पोहोचली. मात्र, देसाई कारखाना अद्यापही मुडदूस झालेल्या अवस्थेत १२५० मेट्रिक टनावरच आहे. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला पाटण शुगरकेन साखर कारखान्याची अधिकाधिक वाढ करणे गरजेचे आहे. उसाच्या माध्यमातून होणारी स्थानिकांची गळचेपी थांबवणे, याला आपले प्राधान्य राहील. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्याचा स्वाभिमान घाण टाकू देणार नाही, असेही विक्रमसिंह पाटणकर म्हणाले.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, आपल्या साखर कारखान्यातून साखर निर्माण होते की गुळ हे विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही. स्वाभिमानी शेतकऱ्यांसाठी या कारखान्याची निर्मिती केली आहे. मी त्यांना आश्वासन देतो की देसाई कारखान्यापेक्षा ऊसाला ज्यादा दर, वेळेत तोड, स्वाभिमानाची वागणूक, काटामारी न करता प्रामाणिक मोबदला आणि सर्वसामान्यांचे शेतीसह रोजगार व्यवसायातूनही आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. विरोधकांना आपल्या कारखान्याची मापं काढण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतःचा कारखाना चांगल्या प्रकारे चालवता आला नाहीच, पण सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढीच त्यांची ध्येयधोरणे आहेत .

आपण कर रूपाने दिलेल्या पैशातून स्वतःच्या कुटुंबांचा उदोउदो करण्याचा डाव आता जनतेने उधळून लावला पाहिजे. जनतेचा पैसा हा जन कल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे. विकास कामातील टक्केवारी पाहता एका वर्षातच त्या कामांची होणारी धूळधाण आणि पन्नास खोकी घेऊनही ज्यांची पोट भरलेली नाहीत, अशी मंडळी आता टक्केवारीच्या माध्यमातून जनतेची लूट करत आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर आता स्वाभिमानी जनतेने पुढे येऊन सार्वत्रिक परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.