दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी विलास चावरी यांचा प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. मात्र, विलास चावरी हे शिंदे गटात गेल्यामुळे याचा धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे.

ठाकरे गटाचे नगरसेवक विलास चावरी यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. ते रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. काही वर्षे त्यांनी खार दांडा शाखेचे शाखाप्रमुख पदही भूषवले होते. त्याचबरोबर, ते 2007 ते 2012 असे दोन टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सोमवारी त्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी विलास चावरी यांना पुढील राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/mieknathshinde/status/1716531098199687460?t=QR_dwByC-MU5Z3kOmPOI8g&s=19

शिंदे गटात चावरी यांच्याबरोबर, उबाठा गटाचे उपशाखाप्रमुख विकास चव्हाण, गटप्रमुख विजय खरपुडे, अजय शिगवण, संतोष ठाकूर, नंदू निकम, सनी टिळेकर यांनी देखील प्रवेश केला. ज्यामुळे आता शिंदे गटाची ताकद आणखीन वाढली आहे. यावेळी बोलताना चावरी म्हणाले की, “गेली कित्येक वर्षे पक्षासाठी पडेल ते सर्व काम जबाबदारीने पार पाडले. मात्र गेल्या काही वर्षात नेतृत्वाकडून अपेक्षित मदत मिळत नव्हती. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाले होतो. ज्यामुळे आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे”