विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील ‘खलनायक’ जयंत पाटीलच; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून वाद पाहायला मिळाला. जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना तिकीट दिले. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरला. नुकत्याच सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल होते कि सांगलीची जागा काँग्रेसकडे जाऊ नये म्हणून काहींनी षडयंत्र रचले, ज्यात मी फसलो. त्यातच आता जतचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी या संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना जबाबदार धरलं आहे. सांगलीच्या खेळीचे ‘खलनायक’ जयंत पाटील आहेत असा थेट आरोप जगताप यांनी केला आहे.

जतमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना विलासराव जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली जिल्ह्यातून वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातला आहे. विशाल पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट न मिळण्याला जयंत पाटील जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटल. सांगलीचे काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहे. जयंत पाटील यांनी या सगळ्या खेळ्या संजय राऊतांच्या माध्यमातून केल्या, असेही त्यांनी म्हंटल त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला असून ते प्रचाराला सुद्धा लागले आहेत. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील, महायुतीकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील असा तिरंगी सामना पाहायला मिळाला आहे. या तिरंगी लढतीचा फायदा- तोटा कोणाला होतोय ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.