विनायक मेटे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांचे चालक एकनाथ कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेटे यांच्या अपघाताचा तपास सीआयडीमार्फत तपास सुरु होता. या तपासानंतर सीआयडीने चालक एकनाथ कदम यांच्यावर कलम 304 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.

14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला होता. मात्र विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मात्र चालक एकनाथ कदम यांच्यावरच संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

यांनतर सीआयडीने मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासले. त्यानुसार मेटेंच्या मृत्यूला चालकच जबाबदार असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झालं. कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. मात्र तिथे दुसरी एक गाडी ओव्हरटेक करत होती. अशावेळी ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यानंतरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.