Vinesh Phogat : तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू येतोय; विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ऑलिम्पिक इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारी विनेश फोगाट भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली असून संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही विनेश फोगाटचे अभिनंदन केलं आहे. मात्र मागील वर्षी घडलेल्या कुस्तीवीरांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा सुद्धा साधला आहे. राहुल गांधींनी याबाबत ट्विट केलं आहे.

काय आहे राहुल गांधींचे ट्विट?

जगातील ३ सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष खोटा ठरवला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरे मिळाली आहेत. ज्यांनी तिला रडवलं ती संपूर्ण सत्ताव्यवस्था आज भारताच्या शूर कन्येसमोर कोसळली आहे. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी विनेश फोगट हिचे कौतुक केलं आहे.

दुसरीकडे विनेश फोगटचा कुस्तीपटू मित्र बजरंग पुनिया यानेही केंद्र विनेशच्याविजयानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला. याबाबत बजरंग पुनियाने ट्विट करत म्हंटल, विनेश फोगट, भारताची सिंहीण जिने आज मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. 4 वेळा जागतिक चॅम्पियन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्याचा पराभव केला. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या मुलीला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले, या मुलीला तिच्या देशात रस्त्यावर ओढले गेले ही मुलगी जग जिंकणार आहे पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केला असं म्हणत बजरंग पुनिया याने एकप्रकारे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

विनेश कडून गोल्ड मेडलची अपेक्षा- Vinesh Phogat

दरम्यान, ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे आहे. ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत विनेशनं १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने चांगली टेकडाउन करत आणखी ४ गुण मिळवले. संपूर्ण सामन्यादरम्यान विनेशने अतिशय वर्चस्ववादी खेळ दाखवत जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. आता अंतिम सामन्यात तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा देशवासियांना आहे.