कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेचा कर्मचारी ड्रेनेजमध्ये अनिरूध्द लाड सफाई करताना मृत्यू पावला. तर एक कर्मचारी अमोल चंदनशिवे आजही रूग्णालयात उपचार घेत आहे. कर्मचारी पडून मृत्यू पावू शकत नाही. कराड नगरपालिकेने सुप्रीम कोर्टाच्या सूचनाचे पालन केलेल्या नाहीत. मानवी मूलमत्र साफ करण्यास बंदी असतानाही, तुम्ही यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून सफाई का केली नाही. प्रत्यक्ष मानवास श्रम करून तेथे काम करण्यास सांगत आहात. तेव्हा अशा दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी केला आहे.
कराड येथे चरणसिंग टाक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक मारोडा, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेतील विविध खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चरणसिंग टाक म्हणाले, पालिकेने मुकादमाला निलंबित केलेल्या कारवाईवर आम्ही संतुष्ट नाही. जिल्हाधिकारी यांच्यासमोर या सर्व बाबी आम्ही मांडणार आहोत. चाैकशी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा जो कोणी दोषी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मूलमत्र संबधी साफसफाईचे काम मानवी पध्दतीने करू नये, अशा सूचना व स्पष्ट आदेश कोर्टाचे आहेत. तरीही मूलमूत्र साफ करण्यासाठी पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
पालिकेत वारसास नोकरी द्यावी
सुप्रीम कोर्टाच्या 10 लाख रूपये निर्देशाप्रमाणे तसेच टीसीबीएसच्या माध्यमातून 10 लाख रूपये असे एकूण 20 लाख रूपये देण्याची मागणी केली आहे. सध्या तातडीने आज 4 लाख रूपये देण्यात आले. तसेच एका वारसास नोकरी द्यावी,अशी मागणी श्री. टाक यांनी केली आहे.