सांगली काँग्रेसमध्ये भूकंप!! विशाल पाटील बंडाच्या तयारीत?? कार्यालयावरील काँग्रेस शब्द हटवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha 2024) जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज असून बंडाच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता जोर धरत आहे.

२ दिवसांपूर्वीच विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं होते. त्यानंतर आज सांगलीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. एवढंच नव्हे तर कवठे महांकाळ, मिरत तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी थेट राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. तर मिरज तालुक्याची काँग्रेसची कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका आता काँग्रेस कार्यकर्ते घेत आहेत. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय.

महत्वाची बाब म्हणजे विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारीचे २ अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामुळे विशाल पाटील बंड करून अपक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास नक्की वाटत आहे. विशाल पाटील अपक्ष लढल्यास काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेणार?? विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. मात्र विशाल पाटलांचे समर्थक ज्याप्रकारे आक्रमक झाले आहेत ते पाहता महाविकास आघाडीची सांगलीचा विजय नक्कीच सोप्पा नसेल हे नक्की.