विश्वजित कदम यांचा मोठा निर्णय!! विशाल पाटलांचा प्रचार करणार की चंद्रहार पाटलांचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पडला होता. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार असून ठाकरेंच्या मशाल ला विशालचे आव्हान असणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसच्या पदरी निराशा आल्यानंतर विश्वजित कदम काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य होते. अखेर आज काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

आज सांगली येथे प्रदेश काँग्रेसचा (Sangli Congress Melava) मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना विश्वजित कदम यांनी आपल्या मनातील खंत जाहीर सभेत बोलून दाखवली. सांगलीची जागा मित्रपक्षांना सोडून आपण चूकच केली, मात्र आता पक्ष सांगेल तो आदेश मान्य असेल, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जी काही मते मिळतील ती काँग्रेसचीच असतील, पण नंतर त्यांनी आवाज काढायचा नाही असा इशाराच विश्वजित कदम यांनी दिला.

विश्वजित कदम म्हणाले, चंद्रहार पाटील हे कुस्तीपटू असून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. आम्ही त्यांना म्हंटल कि तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला विधानपरिषदेवर आमदार करतो, पण ऐकलं नाही. त्यातून मार्ग सुटला नाही. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रयत्न केले. नाना पटोले यांची तर सांगलीच्या जागेवरून हमरीतुमरी झाली. पण आज सांगलीबाबत हे घडलं ते पुन्हा व्हायला नको. म्हणून महविकास आघाडीच्या मते मिळतील ती १००% मते काँग्रेसची असणार आहेत, पण नंतर त्यांनी आवाज काढायचा नाही कि आता विधानसभा द्या आणि अजून काही द्या असं विश्वजित कदम यांनी म्हंटल. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणारी मते काँग्रेसची असणार आहेत त्यामुळे त्यांनीही काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्याचे संरक्षणाची जबाबदारी घ्यावी असेही त्यांनी म्हंटल. त्यामुळे विश्वजित कदम महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचेच काम करणार हे आता स्पष्ट झालं आहे.